काल दि.२५ जानेवारी २०२० रोजी "देवबाभळी"चा ३००वा प्रयोग ठाण्याच्या ’गडकरी’मध्ये पाहिला. तसा वर्षाभरापूर्वी २००व्या प्रयोगाला सुद्धा उपस्थित होतो. एक नक्की की हे नाटक कितीही वेळा पाहिलं तरी प्रत्येक वेळी एक नवा अनुभव होतो, एक नवी झिंग चढते... आज २४ तास उलटून गेल्यावर सुद्धा पूर्णपणे भानावर आलो नाहीये... अजूनही तुकोबारायांच्या देहूतल्या घरातली दृश्ये आणि साक्षात "आवली" आणि "लखूबाई" यांचा सतत होत राहिलेला वावर डोळ्यासमोरून हलत नाहीये.
दोन वर्षात नाबाद ३०० प्रयोग आणि घवघवीत ३९ पुरस्कार यांच्याकडे केवळ नाटकाचं व्यावसायिक यश म्हणून पाहता येणार नाही... एक कलाकृति म्हणून "देवबाभळी"च्या नाट्यरूप सादरीकरणाच्या सौन्दर्यस्थलांचा मागोवा घेणं आणि एक साहित्यकृति म्हणून या नाटकाच्या संहितेचा तटस्थ विचार करणं आवश्यक ठरतं. मराठी नाट्यसृष्टिच्या समृद्ध प्रवासात व प्रवाहात सुरुवातीच्या देवल-कोल्हटकर, गडकरी यांपासून वेळोवेळी सावरकर, बाळ कोल्हटकर, अत्रे, पुलं, कानिटकर-शिरवाडकर, तेंडुलकर वगैरे अनेक टप्पे पार करत आणि वळणं घेत मध्यंतरीच्या काळात एन्एस्डी-पंथाच्या अनुकरणाच्या नादात काहीसा विस्कळितपणा व दिशाहीनता सुद्धा आल्यागत झालं... त्यानन्तर प्रहसनांचाही एक टप्पा आला... पण आज प्राजक्त देशमुखच्या या कलाकृतिने मराठी नाट्यप्रवाहाला नक्कीच एक नवी आव्हानात्मक दिशा दिली आहे असं आवर्जून म्हणावं लागेल.
सामान्यत: मराठी नाटकातील "नाट्य" हे दोन वृत्ति किंवा दोन व्यक्तिंच्या संघर्षावर आधारित असतं. कधी त्यात ’प्रेमाचा त्रिकोण’ सुद्धा असतो. आणि साहजिकच त्या दोघांपैकी एक बाजू बरोबर आणि दुसरी चूक किंवा एक प्रकाशमान तर दुसरी अंधारलेली असं द्वन्द्व स्पष्ट जाणवतं. पण "देवबाभळी"मध्ये असं कोणतंही द्वन्द्व नाहीये... खरं-खोटं, चूक-बरोबरचं विभाजन नाहीये, मात्र दोन प्रत्यक्ष व दोन अप्रत्यक्ष पात्रांमधील आपसातील सम्बन्ध, त्यांच्या मनोवृत्ति आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यातलं आध्यात्मिक नातं यांना समोर ठेवून त्यांच्या प्रत्येका अंगाचं सौन्दर्य शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना घडलेल्या सौन्दर्यबोधाची नाट्यरूप सौन्दर्याभिव्यक्ति म्हणून "देवबाभळी"चा विचार करावा लागेल.
आवली आणि लखूबाई या दोन्ही स्त्रिया आपापल्या नवऱ्यावर मनापासून चिडलेल्या, व्यथित झालेल्या दिसल्या आणि प्रसंगी लखूबाईच्या तोंडून "आपणा बायकांनाच असं सहन करावं लागतं" अशा अर्थाचा उद्गार बाहेर पडला तरीही या दोघी आधुनिक अर्थाने ’फेमिनिस्ट’ नाहीत. आवलीला आपल्या नवऱ्यासाठी पदोपदी अपशब्द उच्चारताना पाहून लखूबाईचा होणारा संताप स्वत:च्या पतिबद्दलच्या एकान्तिक प्रेमाची साक्ष्य देतो; तर "रुसायचं रुक्मिणीनं... ती देवी आहे ना... आपण माणसं, आपण सम्बन्ध तोडून कसं चालेल" असं म्हणणाऱ्या आवलीने ही नाइलाजाने पत्करलेली तडजोड नसून ती आपल्या पतिवरच्या एकनिष्ठ प्रेमाची ग्वाहीच आहे. त्यामुळे आपापल्या पतिचा कितीही राग-राग केला तरी आवली आणि लखूबाई आपापलं स्वतन्त्र व्यक्तिमत्व कुरवाळणाऱ्या आधुनिक "फेमिनिझम"च्या वाटेने नक्कीच जात नाहीत. उलट पतिवर चिडून दूर दिंडिरवनात जाऊन राहणारी रुक्मिणी त्याच पतिच्या शब्दाखातर आपलं देवत्व बाजूला ठेवून आवलीच्या घरात चुलीचा धूर सहन करत स्वयंपाक करण्यापासून केरवारे, धुणीभांडी आणि आवलीची शारीरिक सेवा अशी श्रमाची कामे निष्ठापूर्वक करताना जणु पातिव्रत्याची मानवी भावना चरितार्थ करताना दिसते. आणि आपल्या पतिच्या आध्यात्मिक जीवनामुळे प्रपंचाची वाताहात झाली म्हणून परमेश्वराचाही राग करणारी आवली नकळत तुकोबारायांचंच अनुसरण करत लखुबाईच्या शब्दात "देवळात प्रवेश न करताही गाभाऱ्याचा घुमारा होण्यापर्यन्त" आध्यात्मिक उच्चावस्था गाठत देवत्वाला स्पर्श करताना दिसते.
"देवबाभळी"मध्ये द्वन्द्व असलंच तर ते जणु देवाचं मनुष्यपण आणि माणसाचं देवत्व यांच्यातील स्पर्धेचं आहे. या द्वन्द्वात कोणतीही एक बाजू बरोबर आणि दुसरी चुकीची नाही किंवा एक बाजू प्रकाशमान आणि दुसरी अंधारलेली नाही. या सम्पूर्ण प्रसंगात शोधलं गेलंय ते देवाच्या अमानवीय श्रेष्ठतेमध्ये सुद्धा प्रकटणारं माणुसकीचं सौन्दर्य आणि सीमित क्षमतेच्या मनुष्याच्या जीवनात सुद्धा निष्ठापूर्वक जगून गाठलेल्या आध्यात्मिक पातळीवर देवत्वाच्या साक्षात्काराचं सौन्दर्य आहे... सम्पूर्ण नाटकात समोर दिसत राहणाऱ्या मानवी व्यक्तिरेखांच्या सर्वस्वी मानवी सम्बन्धांच्या व नात्यांच्या व्यवहाराचे प्रसंगांमधून प्रेक्षकालाही कळत-नकळत या अरूप आणि निर्गुण सौन्यर्याचा काही अंशात तरी बोध होत जातो हीच "देवबाभळी"च्या रूपात घडणारी सौन्दर्याभिव्यक्ति आहे.
लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याने जणु आपल्या या नाट्यसंहितेच्या रूपात मराठी नाट्यसृष्टिच्या वर्तमान प्रवाहासमोर एक आव्हान उभं केलंय... आता नाटक म्हणजे नुसती व्यक्तिगत व भावनात्मक द्वन्द्वातून उभी राहणारी हारजीत नसून "देवबाभळी"सारखी चूक-बरोबर वा खरं-खोटं या द्विधेच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनातील शुद्ध सौन्दर्याच्या शोध घेत जाणारी अभिव्यक्ति घडावी ही अपेक्षाच जणु या नाट्यकृतिने मराठी मंचावर प्रस्तुत केली आहे.
संगीत नाटकांच्या परंपरेला सर्वस्वी अनपेक्षित वळण देत "देवबाभळी"च्या मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते या दोन्ही सशक्त गायक-अभिनेत्रींनी दाखवलेली आपली गायनाची क्षमता तर विस्मित करणारी आहे. गाणं म्हणताना नाटकाचा प्रसंग थांबवून वाद्याचा सुर घेत त्याआधारे आपली आलापी सजवण्याची जुनी पद्धत मोडीत काढून या दोघींनी उठता-बसता, केर काढत, भाकरी थापत वा धुणं धूत असतानाच नव्हे तर चक्क आडवं पडून झोपलेलं असताना सुद्धा तालासुराचा पूर्ण भान ठेवत गात राहण्याची अद्भुत क्षमता दाखवून मराठी नाटकाचे संगीत व नाट्यगीतांचे गायन या विधांसमोर यापुढचं पाऊल सहजी टाकता येणार नसलं तरी यापुढे हाच अप्रयास गायनाचा कित्ता गिरवण्याचं आव्हान उभं केलं आहे, असं म्हणणं अतिशयोक्ति नक्कीच नाही.
"देवबाभळी"ने मोडलेला आणखी एक पायंडा म्हणजे आधुनिकतेच्या प्रभावामुळे अधिकांश वेळा धर्म, अध्यात्म, ईश्वर, सन्त व सन्तसाहित्य हे उपहासाचे व उपरोधाचे विषय बनत असतानाच्या काळात या नाटकाच्या रूपाने ईश्वर, सन्त, भक्ति व अध्यात्म यांच्या पूर्ण आदर राखत मराठी माणसाला सर्वस्वी आदरणीय असलेल्या तुकोबारायांच्या व आवलीच्या जीवनातील प्रसंगांमधील भावनात्मक व आध्यात्मिक सौन्दर्य मंचावर प्रस्तुत केलं आहे.
नाटकाचे नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना व रंगमंचव्यवस्था इतक्या उत्कृष्ट कलाकृतिला कुठेही गालबोट लागू न देता नाटकाच्या श्रेष्ठतेला साजेश्या अशाच झाल्या आहेत.
भविष्यात "देवबाभळी"चे शेकडो-हजारो प्रयोग होत राहतील हे तर नि:संशय... पण आता मराठी नाट्यसृष्टिला या निर्माता-लेखक/दिग्दर्शकाकडून अशाच एकेक पाऊल पुढे टाकणाऱ्या नवनव्या कलाकृति मिळतील ही अपेक्षा तर नक्कीच राहील. काय करता, या लोकांनी स्वत:च्याच कर्तबगारीनं आपला दर्जा उंचावून ठेवलेला आहे...!
- स्वामीजी
No comments:
Post a Comment