Monday, 27 January 2020

"देवबाभळी" नाबाद ३००

काल दि.२५ जानेवारी २०२० रोजी "देवबाभळी"चा ३००वा प्रयोग ठाण्याच्या ’गडकरी’मध्ये पाहिला. तसा वर्षाभरापूर्वी २००व्या प्रयोगाला सुद्धा उपस्थित होतो. एक नक्की की हे नाटक कितीही वेळा पाहिलं तरी प्रत्येक वेळी एक नवा अनुभव होतो, एक नवी झिंग चढते... आज २४ तास उलटून गेल्यावर सुद्धा पूर्णपणे भानावर आलो नाहीये... अजूनही तुकोबारायांच्या देहूतल्या घरातली दृश्ये आणि साक्षात "आवली" आणि "लखूबाई" यांचा सतत होत राहिलेला वावर डोळ्यासमोरून हलत नाहीये.
दोन वर्षात नाबाद ३०० प्रयोग आणि घवघवीत ३९ पुरस्कार यांच्याकडे केवळ नाटकाचं व्यावसायिक यश म्हणून पाहता येणार नाही... एक कलाकृति म्हणून "देवबाभळी"च्या नाट्यरूप सादरीकरणाच्या सौन्दर्यस्थलांचा मागोवा घेणं आणि एक साहित्यकृति म्हणून या नाटकाच्या संहितेचा तटस्थ विचार करणं आवश्यक ठरतं. मराठी नाट्यसृष्टिच्या समृद्ध प्रवासात व प्रवाहात सुरुवातीच्या देवल-कोल्हटकर, गडकरी यांपासून वेळोवेळी सावरकर, बाळ कोल्हटकर, अत्रे, पुलं, कानिटकर-शिरवाडकर, तेंडुलकर वगैरे अनेक टप्पे पार करत आणि वळणं घेत मध्यंतरीच्या काळात एन्‌एस्‌डी-पंथाच्या अनुकरणाच्या नादात काहीसा विस्कळितपणा व दिशाहीनता सुद्धा आल्यागत झालं... त्यानन्तर प्रहसनांचाही एक टप्पा आला... पण आज प्राजक्त देशमुखच्या या कलाकृतिने मराठी नाट्यप्रवाहाला नक्कीच एक नवी आव्हानात्मक दिशा दिली आहे असं आवर्जून म्हणावं लागेल.
सामान्यत: मराठी नाटकातील "नाट्य" हे दोन वृत्ति किंवा दोन व्यक्तिंच्या संघर्षावर आधारित असतं. कधी त्यात ’प्रेमाचा त्रिकोण’ सुद्धा असतो. आणि साहजिकच त्या दोघांपैकी एक बाजू बरोबर आणि दुसरी चूक किंवा एक प्रकाशमान तर दुसरी अंधारलेली असं द्वन्द्व स्पष्ट जाणवतं. पण "देवबाभळी"मध्ये असं कोणतंही द्वन्द्व नाहीये... खरं-खोटं, चूक-बरोबरचं विभाजन नाहीये, मात्र दोन प्रत्यक्ष व दोन अप्रत्यक्ष पात्रांमधील आपसातील सम्बन्ध, त्यांच्या मनोवृत्ति आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यातलं आध्यात्मिक नातं यांना समोर ठेवून त्यांच्या प्रत्येका अंगाचं सौन्दर्य शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना घडलेल्या सौन्दर्यबोधाची नाट्यरूप सौन्दर्याभिव्यक्ति म्हणून "देवबाभळी"चा विचार करावा लागेल.
आवली आणि लखूबाई या दोन्ही स्त्रिया आपापल्या नवऱ्यावर मनापासून चिडलेल्या, व्यथित झालेल्या दिसल्या आणि प्रसंगी लखूबाईच्या तोंडून "आपणा बायकांनाच असं सहन करावं लागतं" अशा अर्थाचा उद्गार बाहेर पडला तरीही या दोघी आधुनिक अर्थाने ’फेमिनिस्ट’ नाहीत. आवलीला आपल्या नवऱ्यासाठी पदोपदी अपशब्द उच्चारताना पाहून लखूबाईचा होणारा संताप स्वत:च्या पतिबद्दलच्या एकान्तिक प्रेमाची साक्ष्य देतो; तर "रुसायचं रुक्मिणीनं... ती देवी आहे ना... आपण माणसं, आपण सम्बन्ध तोडून कसं चालेल" असं म्हणणाऱ्या आवलीने ही नाइलाजाने पत्करलेली तडजोड नसून ती आपल्या पतिवरच्या एकनिष्ठ प्रेमाची ग्वाहीच आहे. त्यामुळे आपापल्या पतिचा कितीही राग-राग केला तरी आवली आणि लखूबाई आपापलं स्वतन्त्र व्यक्तिमत्व कुरवाळणाऱ्या आधुनिक "फेमिनिझम"च्या वाटेने नक्कीच जात नाहीत. उलट पतिवर चिडून दूर दिंडिरवनात जाऊन राहणारी रुक्मिणी त्याच पतिच्या शब्दाखातर आपलं देवत्व बाजूला ठेवून आवलीच्या घरात चुलीचा धूर सहन करत स्वयंपाक करण्यापासून केरवारे, धुणीभांडी आणि आवलीची शारीरिक सेवा अशी श्रमाची कामे निष्ठापूर्वक करताना जणु पातिव्रत्याची मानवी भावना चरितार्थ करताना दिसते. आणि आपल्या पतिच्या आध्यात्मिक जीवनामुळे प्रपंचाची वाताहात झाली म्हणून परमेश्वराचाही राग करणारी आवली नकळत तुकोबारायांचंच अनुसरण करत लखुबाईच्या शब्दात "देवळात प्रवेश न करताही गाभाऱ्याचा घुमारा होण्यापर्यन्त" आध्यात्मिक उच्चावस्था गाठत देवत्वाला स्पर्श करताना दिसते.
"देवबाभळी"मध्ये द्वन्द्व असलंच तर ते जणु देवाचं मनुष्यपण आणि माणसाचं देवत्व यांच्यातील स्पर्धेचं आहे. या द्वन्द्वात कोणतीही एक बाजू बरोबर आणि दुसरी चुकीची नाही किंवा एक बाजू प्रकाशमान आणि दुसरी अंधारलेली नाही. या सम्पूर्ण प्रसंगात शोधलं गेलंय ते देवाच्या अमानवीय श्रेष्ठतेमध्ये सुद्धा प्रकटणारं माणुसकीचं सौन्दर्य आणि सीमित क्षमतेच्या मनुष्याच्या जीवनात सुद्धा निष्ठापूर्वक जगून गाठलेल्या आध्यात्मिक पातळीवर देवत्वाच्या साक्षात्काराचं सौन्दर्य आहे... सम्पूर्ण नाटकात समोर दिसत राहणाऱ्या मानवी व्यक्तिरेखांच्या सर्वस्वी मानवी सम्बन्धांच्या व नात्यांच्या व्यवहाराचे प्रसंगांमधून प्रेक्षकालाही कळत-नकळत या अरूप आणि निर्गुण सौन्यर्याचा काही अंशात तरी बोध होत जातो हीच "देवबाभळी"च्या रूपात घडणारी सौन्दर्याभिव्यक्ति आहे.
लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याने जणु आपल्या या नाट्यसंहितेच्या रूपात मराठी नाट्यसृष्टिच्या वर्तमान प्रवाहासमोर एक आव्हान उभं केलंय... आता नाटक म्हणजे नुसती व्यक्तिगत व भावनात्मक द्वन्द्वातून उभी राहणारी हारजीत नसून "देवबाभळी"सारखी चूक-बरोबर वा खरं-खोटं या द्विधेच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनातील शुद्ध सौन्दर्याच्या शोध घेत जाणारी अभिव्यक्ति घडावी ही अपेक्षाच जणु या नाट्यकृतिने मराठी मंचावर प्रस्तुत केली आहे.
संगीत नाटकांच्या परंपरेला सर्वस्वी अनपेक्षित वळण देत "देवबाभळी"च्या मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते या दोन्ही सशक्त गायक-अभिनेत्रींनी दाखवलेली आपली गायनाची क्षमता तर विस्मित करणारी आहे. गाणं म्हणताना नाटकाचा प्रसंग थांबवून वाद्याचा सुर घेत त्याआधारे आपली आलापी सजवण्याची जुनी पद्धत मोडीत काढून या दोघींनी उठता-बसता, केर काढत, भाकरी थापत वा धुणं धूत असतानाच नव्हे तर चक्क आडवं पडून झोपलेलं असताना सुद्धा तालासुराचा पूर्ण भान ठेवत गात राहण्याची अद्भुत क्षमता दाखवून मराठी नाटकाचे संगीत व नाट्यगीतांचे गायन या विधांसमोर यापुढचं पाऊल सहजी टाकता येणार नसलं तरी यापुढे हाच अप्रयास गायनाचा कित्ता गिरवण्याचं आव्हान उभं केलं आहे, असं म्हणणं अतिशयोक्ति नक्कीच नाही.
"देवबाभळी"ने मोडलेला आणखी एक पायंडा म्हणजे आधुनिकतेच्या प्रभावामुळे अधिकांश वेळा धर्म, अध्यात्म, ईश्वर, सन्त व सन्तसाहित्य हे उपहासाचे व उपरोधाचे विषय बनत असतानाच्या काळात या नाटकाच्या रूपाने ईश्वर, सन्त, भक्ति व अध्यात्म यांच्या पूर्ण आदर राखत मराठी माणसाला सर्वस्वी आदरणीय असलेल्या तुकोबारायांच्या व आवलीच्या जीवनातील प्रसंगांमधील भावनात्मक व आध्यात्मिक सौन्दर्य मंचावर प्रस्तुत केलं आहे.
नाटकाचे नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना व रंगमंचव्यवस्था इतक्या उत्कृष्ट कलाकृतिला कुठेही गालबोट लागू न देता नाटकाच्या श्रेष्ठतेला साजेश्या अशाच झाल्या आहेत.
भविष्यात "देवबाभळी"चे शेकडो-हजारो प्रयोग होत राहतील हे तर नि:संशय... पण आता मराठी नाट्यसृष्टिला या निर्माता-लेखक/दिग्दर्शकाकडून अशाच एकेक पाऊल पुढे टाकणाऱ्या नवनव्या कलाकृति मिळतील ही अपेक्षा तर नक्कीच राहील. काय करता, या लोकांनी स्वत:च्याच कर्तबगारीनं आपला दर्जा उंचावून ठेवलेला आहे...!
- स्वामीजी

Tuesday, 16 July 2019

गुरुपौर्णिमा १६ जुलै २०१९

आज गुरुपौर्णिमा... महर्षि वेदव्यासांच्या जयन्तीच्या निमित्ताने प्राचीन ऋषिंच्या काळापासून अनवरत चालत आलेल्या ज्ञानपरम्परेबद्दल श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करण्याचे पर्व..!
हा ’शिक्षक दिन’ किंवा ’अध्यापक दिवस’ नाही व विद्यालयांच्या अभ्यासक्रमाची पुस्तके शिकवणाऱ्यांना आपल्या परम्परेने ’गुरु’ म्हटले नाही हे सुद्धा यावेळी लक्षात ठेवायला हवे. विद्यालयांचा अभ्यासक्रम आणि तो शिकवणारे किंवा काहीही शिकवणारे शिक्षक/अध्यापक हे आखाला माहीत नसलेल्या वस्तु वा विषयाबद्दल माहिती देतात. पण "मी आहे" हे स्वत:च्या अस्तित्वाचं भान प्रत्येकाला असतंच, फक्त ’मी अमुक आहे’ असा भ्रम निर्माण झालेला असतो... त्या भ्रमाचं निवारण करून आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाची ओळख पटवून देतो, त्यालाच आपल्या परंपरेने ’गुरु’ म्हटलं आहे.

वस्तुत: ’गुरु’ हे वेद-उपनिषदांच्या काळापासून चालत आलेल्या अध्यात्मविद्येचे संवाहक असतात आणि आत्मबोधाद्वारे जीवाला मुक्तिचा अपरोक्ष अनुभव करते तिलाच ’विद्या’ म्हटलं गेलंय... "सा विद्या या विमुक्तये"...! विद्यालयांचा अभ्यासक्रम आणि तो शिकवणारे
सामान्यत: प्रत्येकाला इंद्रियांच्या द्वारे स्वत:व्यतिरिक्त बाह्य जगाचे भाग होते, परन्तु व्यक्ति स्वत:च्या अस्तित्वाला ’माझा/माझी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन्य वस्तुंच्या आश्रित मानतो... म्हणूनच हाडामांसाच्या बनलेल्या शरीराचं वय, त्याची उंची, रंग व रोगी/निरोगी असणं यांनाच स्वत:चं लक्षण मानतो तर मनाच्या एकाग्रता व विक्षेपाला स्वत:चाच गुणधर्म मानतो... पण यामुळे स्वत:च्या वास्तविक स्वरूपाचं भान व ओळख यांचा त्याला विसर पडतो...!
खरं तर जाग्रत-स्वप्न-सुषुप्ति असो वा बाल्य-तारुण्य-वार्धक्य असो, शरीराच्या सगळ्या अवस्था आणि परिवर्तनामध्ये या सगळ्याला जाणणारा ’मी’ हीच आपल्या ’स्व’ची खरी ओळख असते..! मनाची कोणतीही वृत्ति वा बुद्धिचा विचार कितीही बदलला तरी त्या परिवर्तनाचे आणि त्याचबरोबर मन-बुद्धिचे सुद्धा भान असणारा ’मी’ हेच स्वत:चे स्वरूप असते. ’माझे’ म्हणून ओळखली जाणारी इन्द्रिये, शरीर व मन-बुद्धिशी या सर्वांना जाणणाऱ्या ’स्व’चे तादात्म्य हेच बन्धन आहे आणि या सर्वांविरहित शुद्ध आत्मभान व आत्मपरिचय यांना नित्य आत्मबोधाच्या रूपात स्थिर करणारी विद्या हीच आत्मविद्या आहे आणि ती प्रदान करणारालाच आपल्या परम्परेने गुरुरूपात वन्दनीय मानलेले आहे.
आपल्याला गुरुपरम्परेच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या ’आत्मबोधा’त डोळे झाकून ’मानण्या’जोगं काहीच नाही. स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कुणाच्या सांगण्याची वा कुणा ग्रन्थात लिहिलेलं असण्याची आवश्यकताच नाहीये. शरीर-मन-बुद्धि आदि उपकरणांना जाणणारा, त्यांचे संचालन करणारा, त्याच्या असण्याचे अधिष्ठान असणारा व त्यांच्यामधील प्रत्येक परिवर्तनाचा साक्षीदार असणारा ’मी’ हा तर प्रत्येकाचा अकाट्य अनुभव आहे, अशा आत्मबोधासाठी अन्य कोणत्याही पुराव्याची गरज नसते... बस, प्रत्येकाला होणारा "मी आहे" हा अनुभव स्वत:प्रमाण आहे.
भगवान्‌ आद्य शंकराचार्यांनी या आत्मभानाची व आत्मबोधाची जाणीव व ओळख करून देणाऱ्याच्या रूपात भगवान्‌ सदाशिवाच्या गुरुरूप श्री दक्षिणामूर्तिला नमस्कार करताना या स्वत:सिद्ध श्त्मबोधालाच इंगित केलं आहे...
बाल्यादिष्वपि जाग्रदादिषु तथा सर्वास्ववस्थास्वपि
व्यावृत्तास्वनुवर्तमानमहमित्यन्तः स्फुरन्तं सदा।
स्वात्मानं प्रकटीकरोति भजतां यो मुद्रया भद्रया 
तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये ॥

(बाल्य-तारुण्य आदि शारीरिक अवस्था, जाग्रत-स्वप्नादि मानसिक अवस्था तथा स्न्य सर्व अवस्थाभेदांमागे असणारा आणि तरीही त्यांच्यापेक्षा विलग (वेगळा) असा सतत "मी आहे" अशा स्फुरणरूपाला आपल्यासमक्ष उपस्थित शरणागत जिज्ञासु्पाशी जो भद्र मुद्रेद्वारे प्रकट करतो, अशा त्या गुरुरूपी श्री दक्षिणामूर्तिला नमस्कार॥)
"माझ्या शरीराची उंची/बुटकेपण, रंग, जाडी, रोगी/निरोगी असणं यांना जाणणारा मी" किंवा "माझ्या मनाच्या सुखी/दु:खी असण्याचं भान असणारा मी" याऐवजी शरीर-मनबुद्धि आदिंच्या गुणधर्मांना स्वत:वर लादून ""मी उंच/बुटका, काळा/गोरा, जाड/सडपातळ वा सुखी/दु:खी आहे" असं मानणं हा केवळ भ्रम आहे आणि अशा भ्रमाचा निरास करून "शरीर व मनाच्या प्रत्येक अवस्थेचं मला भान आहे आणि त्यात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनामागे माझं स्वत:चं अस्तित्व अपरिवर्तनीय आहे" हे स्पष्टपणे समजणं व अशा आत्मभानाचं अनुसंधान करणं हीच आत्मविद्या आहे, हीच भारतीय अध्यात्मविद्या आहे..!
प्रत्येकाला स्वत:चा हा स्वयंसिद्ध अनुभव घेण्यासाठी कोणत्याही ग्रन्थाची वा अभ्यासक्रमाची आणि या अनुभवाला सिद्ध करण्यासाठी कोणा प्रयोगशाळेची गरज नसते. "मसि कागद छूयो नहीं, कलम गही नहिं हाथ" म्हणणारे सन्त कबीरदास सुद्धा या स्वनिष्ठ अनुभवाचं वर्णन करतात तर तसेच कमी शिकलेले सन्तश्रेष्ठ तुकाराममहाराज तर
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ॥
खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाही मजुरीचे ॥
स्वत:च्या आत्मानुभवसम्पन्न असण्याची ग्वाही देताना पुस्तकी पाण्डित्याला तुच्छच मानतात..! या आत्मभानामध्ये अनुभवविरुद्ध वा तर्कविसंगत काहीच नसल्याने स्वत:च्या तथाकथित बुद्धिवादी व विज्ञाननिष्ठ असण्याची वल्गना करणारे कोणीही पुस्तकी पण्डित स्वत:च्या या स्वाभाविक अनुभवाला नाकारू शकत नाहीत; भले या तटस्थ आत्मभानाला स्वीकारल्याने ’आस्तिक’ म्हटलं जाण्याच्या भीतिपोटी चुप बसतील, पण शरीर-मनबुद्धि आदिपेक्षा वेगळ्या अशा आत्मस्वरूपाला नाकारू शकत नाहीतच..!

ग्रन्थ, अभ्यासक्रम व प्रयोगांच्या आधारे मिळणारी ’माहिती’ ही नेहमीच ’स्व’व्यतिरिक्त अन्य कशाची तरी असते, परन्तु अशा माहितीला जाणणारा "मी आहे" हा अनुभव मात्र बाह्य कशाचाही माहितीविनाच होतो.... केवळ या शुद्ध आत्मस्वरूपाचं स्मरण करून द्यावं लागतं. उपनिषद्‌ आणि भगवद्गीतेच्या "श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्‌" तथा "ज्ञनिन: तत्त्वदर्शिन:" या संकेतानुसार गुरु स्वत: शास्त्रनिष्ठ आणि स्वानुभव्सम्पन्न असणं अपेक्षित आहे. प्रत्येकाला अन्तर्मुख होऊन थोडा विवार करताच होणारे आत्मस्वरूपाचे भान देशकालादि सीमांच्या पलीकडे जाऊन्स्थिर आत्मानुभवात परिणत होण्यासाठी गुरु द्वारा उपदिष्ट साधनापद्धतिचे क्रमबद्ध अनुसरण आवश्यक असते. गुरुला स्वत: अशा साधनामार्गांवर स्वत: चालल्याला अनुभव असल्याने साहजिकच तो स्वानुभवनिष्ठ मार्गदर्शन करू शकतो. अर्थातच सन्तश्रेष्ठ तुकाराममहाराज म्हणतात
"अधिकार तैसा करू उपदेश । साहे ओझे त्यास तेची द्यावे॥ 
मुंगीवरी जरी गजाचे पालाण । घालिता ते कोण कार्यसिद्धी ॥"
त्याप्रमाणे शिष्याची मानसिक व बौद्धिक स्थिति न्‌ क्षमता यांचा विचार करून साधना म्हणून उपासना, ध्यान, कर्म वगैरे विभिन्न साधनांपैकी उचित मार्गाचा उपदेश केला जाऊ शकतो.अशा साधनामार्गाचे अनुसरण केल्याने आपल्या ’स्व’च्या अनुभवाची परिणती असीम अखण्ड परमात्मसाक्षात्कारात होणे हेच आत्मविद्येचे चरम लक्ष्य आहे.
आत्मस्वरूपाचा बोध आणि साधनामार्गाविषयी मार्गदर्शन करणारा हाच आपल्या आर्ष आत्मविद्येचा संवाहक ’गुरु’ आहे आणि अनादि काळापासून चालत आलेल्या या गुरुपरम्परेबद्दल श्रद्धा व कृतज्ञता यांची अभिव्यक्ति हीच ’गुरुपौर्णिमा’ आहे...!
- स्वामीजी, गुरुपौर्णिमा २०१९